ऍडव्होकेट भास्करराव आव्हाड यांचे "श्री स्वामी समर्थ- औंध" पुरस्कार २०१८ सोहळ्यातील मनोगत

"श्री स्वामी समर्थ- औंध" पुरस्कार २०१८- ऍडव्होकेट भास्करराव आव्हाड
"श्री स्वामी समर्थ- औंध" पुरस्कार २०१८ सोहळ्यात पुरस्कार आणि सन्मानपत्राचा स्वीकार करतांना ऍडव्होकेट भास्करराव आव्हाड

माझ्या विद्यपीठाचे कुलगुरु कारमाळकर सर, आमचे धर्मदाय आयुक्त कचरे साहेब, उपायुक्त जगताप साहेब, त्यानंतर आमचे बारचे अध्यक्ष श्री सुभाष पवार, श्रीकांत पाटील, ऍडव्होकेट वाडेकर, त्यांचे सर्व सहकारी, या स्वामी समर्थ प्रतिष्ठानचे सर्व विश्वस्थ आणि व्यवस्थापक मंडळावरील सदस्य, आणि भक्तगण.

खरं म्हणजे, तुम्ही माझा सत्कार केल्या नंतर मी काहीतरी जास्त बोलायचं, अशी ही वेळ नव्हे. पण, तरीसुद्धा सत्कार कशासाठी केला गेला. जरी कायद्या मध्ये मी शिकवत असलो तरी वाग्मयामध्ये माझे काही गुरु मंडळी आहेत. त्यात शांताबाई शेळके, या काव्य क्षेत्रामध्ये मी त्यांना गुरु मानायचो. त्यांनी मला एकदा असा प्रश्न विचारला होता, सर्व साहित्यिक कंगाल असतात. त्यांच्याकडे जेमतेम राहण्यापुरते पैसे असतात. आणि इतरांच्या कडे लागेल तेव्हढे पैसे असतात असे का? आता, त्या गुरुंनीच प्रश्न विचारल्यानंतर, कुठलाही बेबनाव किंवा मनातून योजना करता, जे प्रामाणिक पणाने सुचले ते उत्तर मी त्यांना असं दिलं होतं. की माणसाच्या जीवनात मोल हीअसते आणि मूल्य ही असते. तुम्हाला काय हवे ते ठरवायला लागते. मोल हवे असेल तर मूल्य मिळत नाही. मूल्य हवे असेल तर मोल मिळत नाही. 

आणि मग जो एखादा लेखक किंवा कवी पाच-सात पिढ्या घडवणारे वांग्मय लिहू शकतो त्याच्या कडे मूल्य असते, मोल नसते, खाण्या-पिण्या पुरते पैसे असतात. त्यांची पुस्तकं जे लोक प्रकाशित करत असतात त्या प्रकाशकांचे बंगले असतात. आणि ती पुस्तकं फाटल्यानंतर जी रद्दी विकत असतात ते नगर शेट असतात. म्हणजेच, तुम्हाला पहिला चॉईस हा करावा लागतो की आपल्याला मूल्याधिष्टित जीवन जगायचे आहे की मोलधिष्टीत जीवन जगायचे आहे. मग, मूल्याधिष्ठित जीवन जर असेल तर ते आतून जगलेले असते. मोलधिष्टीत बाहेरून जगलेले असते. मी बाहेरचा जो मोठा दिसतो, कोणत्या मोठ्या गाडीतून आलो वगैरे.

आता आमचे कुलगुरू इथे आहेत. आणि आपल्या संस्कृती प्रमाणे कुलगुरू शब्दाला एक वेगळा अर्थ आहे. आणि मगाशी, मला श्रीकांतजींनी सांगितले की त्यांचा या वर्षीचा उद्देश आहे, प्रार्थना या विषयाचा.

आता प्रार्थना द्वैताने सुरु होते आणि अद्वैतात संपते. प्रार्थनेमध्ये नेहमी मला घडवले कुणीतरी, आणि त्याच्या विषयी ऋण व्यक्त करणारा मी कुणीतरी, ही सुरवात असते द्वैत. आणि मग नारद सांगतात त्यांच्या नारदस्मृती मध्ये त्या प्रमाणे शेवटी भक्त त्या ईश्वरात विलीन होतो किंवा ईश्वर त्या भक्तात विलीन होतो. आणि ती प्रार्थना म्हणजे तुमच्या आतली प्रार्थना असते बाहेरची नव्हे. असे अवघड विषय तुम्ही घेऊन यज्ञा पर्यंत तुम्ही गेलात तुमचे अभिनंदन.

हे कार्य फार मोलाचे आहे, महत्वाचे आहे. आणि यात जास्त वेळ घेण्याच्या ऐवजी मी म्हणेन, की आता कचरे साहेबांनी सांगितले, की अधनंमधनं मी प्रवचनं वगैरे करतो. पण त्याच्या मध्ये एक ठरलेला उद्देश असतो. की, आता ते देवस्थानांच्या मागे लागले आहेत बघा. आणि मग, मोठया हिंमतीने लागले आहेत. महत्वाची गोष्ट आहे. कारण देवस्थानला हात लावायला लोक घाबरतात. देवस्थान हा एक वेगळा विषय, जो धर्मदाय आयुक्तांच्या अखत्यारीत आहे. तिथे नेहेमी त्यांना खूप अपप्रकार बघायला मिळातात. त्यांना किती बोलता येते? त्यांनी सांगितले जज्जेसने बोलायचे नसते, जगताप साहेबांनी बोलायचे नसते. परंतु मला बोलायला हरकत नाही. निदान पंचाहत्तरीत तरी. आणि मग असं सापडत बघा की आज-काल धर्माचा बाजार झाला आहे. सगळ्यात चांगला उद्योग जर सुरु करायचा असेल तर देऊळ काढावे. दुसरे कुठले काम करता ! अहो डोके आपटून जर पैसे देत असतील तुमच्या पाया पडून ! आणखी काय पाहिजे. उद्या सुभाष पवारने जर एखादी केस नीट चालवली नाही तर क्लायंट लगेच आमच्याकडे तक्रार करतो बार काउन्सिगला, "या वकिलाने असे केले".  इथे काही नाही आणखी एक नवस !

मग, इथे एक फरक आहे. तिथे मी थोडासा सांगणार आहे आणि थांबणार आहे. की धर्मामध्ये धर्म प्रसारक असतात. ज्यांना आपण संत म्हणतो. आणि धर्ममार्तंड असतात, जे धर्माचा व्यापार करत असतात. संत जो असतो तो आपल्या जवळ जे आहे ते भक्तांना देत असतो. त्याला जमेल, त्याला सुचेल, त्याला पचेल, ज्याला रुचेल अशा पद्धतीने त्याने घ्यावे त्याची त्याची वाढ करावी. पण धर्ममार्तंड हा क्रूर माणूस असतो. म्हणजे सेंट आणि प्रिसेप्टर यांच्या मध्ये फरक आहे. हा धर्ममार्तंड जो आहे, हा नेहेमी तुम्ही एकदा त्याच्याकडे गेला ! की प्रथम तुम्हाला सांगतो की तुला काही काळात नाही. फक्त तुला काही येत नाही तुला काही काळत नाही "ही ह्याज रिजेक्टेड यू". तुमचा त्याग केलेला आहे. आणि तुमचाही विश्वास बसतो की, मला खरंच काही काळत नाही, बाबा सांगतील तेच खरं ! मग असे झाले की तुम्ही स्वतःला डीजेक्ट करत असता. आत्म निर्भत्सना करत असता. आणि मग तुमचा विश्वास संपला, आत्म विश्वास संपला की तुम्ही त्याच्याकडे जाता. मग समजा एखाद्याने जर तुम्हाला विचारले की, "काहो तुमच्या हातातला फोन जो आहे, हे सॅमसंगचे सगळे फोन सारखे का? एका कंपनीचे आहेतना ! सारखेच असणार !" मग हा काय करतो धर्ममार्तंड, तुम्हाला तुमच्यातला मी काढून घेऊन त्याच्या मशिन मध्ये घालतो, आणि त्याला पाहिजे तसे बोन्झाय तयार करतो, एका साईजचे. वेगवेगळी माणसे राहू देत नाही, व्यक्तिमत्व राहू देत नाही. मग हेच लोक तुकारामांचा छळ करत असतात. हेच लोक ज्ञानेश्वरांचा छळ करत असतात. कारण त्यांना स्वतः:चा धंदा चालवायचा असतो.

आणि आम्हाला संत पाहिजेत, आम्हाला धर्ममार्तंड नको आहेत. मग धर्ममार्तंड करतात ते कर्मकांड असते. आणि संत करतात तो यज्ञ असतो. त्याच्यातून ते चारित्र्य घडवण्याचा प्रयत्न करत असतात. जो धर्म चारित्र्य घडवतो तेव्हढाच धर्म असतो. मग त्याला धर्म नाही म्हटले तरी देखील चालेल ! विद्यापीठातल्या एखाद्या प्राध्यापकाने विज्ञानावरचे लेक्चर जरी दिलं, तरी तो देखील धर्मच असतो. कारण ते चारित्र्य घडवत असतात.

आणि मग, हे जर असेल तर तुम्ही एक बघाल बघा ! की जगामध्ये आम्हा वकिलांना तुम्ही कितीही दोष द्या. जगामध्ये सगळ्या लढाया वकिलांनी जिंकलेल्या आहेत आणि वकिलांनी लढलेल्या आहेत. त्या अब्राहम लिंकन पासून चर्चिल असूदेत ! टिळक असूदेत ! आमचे नंतरचे सगळे गांधीजी पासून सर्व राजकारणी असूदेत. कारण इथे एक बाळकडू मिळते की हक्कासाठी झगडायचे. आणि हे बाळकडू पुढे चालवायला आमचे श्रीकांत, त्यांच्यातला वकिल जागा झाला. ही महत्वाची गोष्ट आहे. आणि वकिलांनी सामाजिक भान ठेवायचे असतं आणि सामाजिक जाणिवा पाळायच्या असतात. या साठी तुम्हाला आणखी शुभेच्छा. आणि शेवटी फक्त एक गोस्ट सांगून मी थांबणार आहे, ती अशी की आता आमचे कचरे साहेब जसे म्हणाले, तसं कुठेतरी त्या बाबाच्या शेजारी जाऊन बसून महाराजांच्या शेजारी जाऊन बसून कर्मकांड धर्म कसा नाही, बंडाची भाषा बोलताना जर बोलले. आणि तुकोबा असे म्हणतात, ज्ञानेश्वर असे म्हणतात, असं म्हणत म्हणत बोललं तर त्याला जाणवते की आपल्याला सुरुंग लागलेला आहे ! पण शब्द तसे नाहीयेत.

एका बाबांनी मला एकदा असे विचारले, की आव्हाड सर मग तुमच्या मताने धर्म म्हणजे कायमग तो विषय माझ्या डोक्यात राहिला. मी ही अस्वस्थ झालो की मी का सांगू शकत नाही? आणि पुढच्या वेळेला माझाच एक अभंग तयार झाला. आणि, त्याच्या वरती मी पुढच्या वेळेला तिथे जाऊन प्रवचन केले.

आता ! श्रीकांतनी आज घेतलेला जो विषय आहे "दिंडी".  त्या अभंगाचे नाव आहे दिंडी. तो सोपा अभंग एव्हढा आहे की, दिंडी आमची असते. कुठे तरी एक आमचा धाकटा देव असतो देहूत. किंवा आळंदीत. आणि धाकट्या देवाचा थोरला देव असतो पंढरीत. मग या धाकट्या देवाची भेट थोरल्या देवाशी करून देण्या साठी आम्ही निघतो. एखादी चांगली गाडी सजवतो त्याला पालखी म्हणतो. त्याच्या मध्ये प्रथा जशा असेल त्या प्रमाणे त्याची प्रतिमा, पादुका ठेवतो. आम्ही त्या पालखीला भजन कीर्तन म्हणत म्हणत शुद्ध वातावरणात या ठिकाणा पासून नेऊन पांढरी पर्यंत पोहचवतो. आणि त्या धाकट्या थोरल्या देवाची भेट घालून देतो

बहुतेक सर्व धर्मामध्ये आत्मरुपी जे तुमचे जीवन आहे, याची शेवटची व्यवस्था परमात्म्यात विसर्जन व्हावे. मग त्याला वैदिक धर्मा मध्ये मुक्ती म्हणतो आपण. मुक्ती मध्ये आत्म्याचे परमात्म्यात विसर्जन झाले म्हणजे मुक्त झाला. मग आता पुढे कुठे तरी यमाचा दरबार आहे. तिथे ते एक जज्ज आहेत. यमराज नावाचे. तिथे एक प्रॉसिक्युटर आहेत चित्रगुप्त नावाचा. त्याने चार्जशीट तयार केले आहे. आणि डिफेन्स लॉयर सुद्धा नाही, बचावाचा पुरावा द्यायचा नाही, लगेच निर्णय, यांच्यावर विश्वास ठेवायची गरज नाही.

माझी आपली वेगळी पालखी अशी ! आणि आमच्या कडे ज्ञानेश्वर, निवृत्ती, सोपान आणि मुक्ता या चार भावंडांच्या नावाला, या चार शब्दाला चार विशाल अर्थ देखील आहेत. मग आता मुक्ती मिळवण्याची चार साधने आहेत. ज्ञानयोग, आद्यशंकराचार्य सांगतात तसे, की बाहेर काही शोधायचे नसते. तत्वमसि, सगळे काही आतच आहे हे तुला कळाले म्हणजे पुष्कळ झाले. दुसरा आहे कर्म योग. ज्याच्या मध्ये कर्म करावे पण ते त्याच्यात गुंतता कर्म करावे. तिसरा आहे भक्ती योग. भक्तिच्या मार्गाने तुम्ही तिथे जाऊ शकता. आणि मग हटयोग. म्हणजे हे सगळं एकत्र सामान्य माणसासाठी असं येईल ? मग ती दिंडी अशी जाते ! की जर माझ्या आतमध्ये जो आत्मा आहे, याला मुक्ती मिळवायची शरीर तर इथेच राहायचे. रामाचे असो नाहीतर कृष्णाचे असो ! ते इथेच राहणार आहे. फक्त आतला आत्मा जायचा आणि त्याचे परमात्म्यात विसर्जन करायचे, म्हणजे मुक्ती मिळवायची. तर मग हा आत्मा आला कुठून? परमात्म्याचा अंश आहे ! म्हणजे माझ्या आतमध्ये छोटा देव आहे. या छोट्या देवाचे त्या मोठ्या देवांमध्ये विसर्जन करायला जायचे आहे. म्हणजे पाळण्या पासून स्मशानापर्यंतची एक दिंडी होईल का नाहीआणि मग ही दिंडी कशी जावी ? मग इथे पुढची कल्पना अशी की;

देहाची पालखी आत्मा राम आत | चालत असे दिंडी, जीवनाची वाट ।।

कृपा ज्ञानियाची झडावे तिमिर |
इथे ज्ञानिया म्हणजे ज्ञानेश्वर होतील, किंवा आत्मज्ञान, शुद्धज्ञान देखील होईल.

कृपा ज्ञानियाची झडावे तिमिर | ओळख माझीच पटावी सत्वर ।। 
मी कोण आहे? माझ्यात देवत्व आहे हे मला जाणवावे.

सुटावी मागुती विषयांची आस |
काम क्रोध मंद मत्सर माया लोभ, या विषयांची आस जरा कमी व्हावी. मी काही रामदास न्हवे सन्यास घ्यायला ! मी आपला गृहस्थाश्रमी माणूस

सुटावी मागुती विषयांची आस | संसारात देई निवृत्ती मनास ।।
इथे निवृत्तीचा आपण दुसरा अर्थ घेतला.

श्रद्धाशील मना लाभावे लोचन |
श्रद्धा असाव्याच लागतात. कशा वरही ठेवावी, विज्ञानावर ठेवली तरी श्रद्धाच ! पण ती डोळस पाहिजे, अंधश्रद्धा नको.

श्रद्धाशील मना लाभावे लोचन | सापडो जवळी भक्तीचा सोपान ।।
सोपान म्हणजे जीना, जिथे, नारदस्पुर्ती मघ्ये नारद म्हणतात, की भक्ती नेहेमी खालच्या पायरीवर सुरु होते, कर्मकांड. मग नारळ फोडणे, उदबत्त्या लावणे, डोके आपटणे, भक्ती झाली. आणि मग पोल्ट्री फार्मवाला सुद्धा म्हणतो, आज पूजा छान केली, दिवसभर माझा उद्योग छान चालेल. अशी सुद्धा भक्ती. ही भक्ती, नारद असे म्हणतात, ही गौणी भक्ती आहे. हिच्या पासन दररोज भक्त वरच्या पायरीवर गेला पाहिजे. आणि त्याची आत्मिक भक्ती सुरु झाली पाहिजे. मग ती पारा भक्ती शेवटच्या स्टेजला जेव्हा येते, तेव्हा एकतर भक्त ईश्वरात विलीन होतो, किंवा ईश्वर भक्तात विलीन होतो ! दोन राहात नाहीत एकच असतात. असा मला जी काही श्रद्धा असेल;

श्रद्धाशील मना लाभावे लोचन | सापडो जावळी भक्तीचा सोपान ।।

माझी भक्ती वर जाणारी असावी, जिन्याने जाणारी असावी.

पोचावी पालखी विठ्ठलाच्या दारी | मिळो मुक्ती तेथे दिंडीच्या अखेरी ।।

विठ्ठलाचे दार काय आहे आता ? मृत्यू ! तो सगळ्यांनाच यायचा आहे. माझी पालखी तिथे पोचावी. दिंडी तिथे पोचावी. आणि मग वरच्या यमराजाकडे वगैरे जायचे हे सोडून देऊन, येव्हढे तर विचारा ? की मिळाली तुला साठ-सत्तर वर्षे. नक्कीच तुमचा आत्मा तुम्हाला विचारेल की मी आता निघालो. आणि मग प्रश्न पडेल की, कसा जगलास तुला मिळालेली वर्षं ? आतून आवाज आला, नको तेच केले, नरक ! आतून आवाज आला, ठीक जगलो, स्वर्ग ! मुक्त ! म्हणजेच आपण दररोज जगात असताना दररोज काम करत असताना जर आपल्यातली आत्मशक्ती साक्षी ठेऊन केले तर तो धर्म आहे. आणि कर्मकांड कितीही केले पण आपण कृत्य करत गेला, तर तो अधर्म आहे. अशा पद्धतिने धर्म तुम्ही सांगितला, तर तो धर्म अज्ञान मूलक नसून ज्ञान मुलक असेल.

आजकाल धर्माकडे चेस्टेने बघितले जाते. त्याचे महत्वाचे कारण आपण धर्म आणि शास्त्र याचे वेगळेपण केलं. धर्म म्हणजे कुठलाही प्रश्न विचारायचाच नाही ! पूर्वीचे जे तेच खरं ते म्हणायचं ! असं नसतं. धर्म नेहेमी शास्त्राच्या परिसावरच घासून बघितला पाहिजे. असे केले तर धर्म छान टिकणार आहे. आणि धर्म टिकला तर आपण टिकणार आहोत. मुल्याधीष्टीत समाज होणार आहे. त्याचेच एक असे म्हणता येईल, की आता श्रीकांत पाटील आपण सर्वानी जो काही माझा सन्मान केला ! माझ्या पत्नीचा सन्मान केला ! मान पात्र दिलं ! त्याच्या बद्दल मी किती पात्र आहे त्याला, मला माहीत नाही. पण ! बराचसा अपात्र आहे एव्हढे मात्र जाणवतंय. आणि म्हणून या सन्मानाचा अर्थ मी एव्हढाच मी समजतो, की आज तुम्ही मला जाणीव करून दिली, की एव्हढेच नव्हे आणखी पुष्कळ काहीतरी केले पाहिजे. आणि त्या साठी फक्त आम्ही तुम्हाला डिवचलेले आहे, एव्हढा त्याचा अर्थ घ्यावा. आणि विशेष म्हणजे आमचे कुलगुरु येथे आहेत, आणि कचरे साहेब, जगताप साहेब ही सगळी दिग्गज मंडळी येथे आहेत. त्या सर्वांचे मी आभार मानतो

धान्यवाद

(दिनांक ५ मे २०१८ रोजी "श्री स्वामी समर्थ- औंध" पुरस्कार २०१८ सोहळ्यातील भाषणावरून संपादित)