श्री स्वामींचा पालखी सोहळा

पुण्यातील औंध, बाणेर, बालेवाडी  परिसरात दर वर्षी श्री स्वामींच्या पालखीचे आगमन होते. विविध कार्यक्रमाची रेलचेल असलेला  हा भव्य सोहळा सात दिवसांचा असतो. या पालखी सोहळ्याचे "श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान औंध" संस्थेतर्फे २००१ साला पासून आयोजन केले जाते. सर्वत्र संचार करणारी स्वामी शक्ती या सोहळ्याच्या निमित्ताने आपली कृपा विशेष प्रकारे प्रकट करते. पालखीच्या काळात स्वामी आपली कृपा मुक्त हस्ताने वाटतात. भक्त हृदयात आनंदाची उधळण करतात. आपल्या वास्तव्याने त्या स्थानाचे तीर्थस्थान करतात. म्हणूनच असमाधान, स्वार्थ यांचा जोर असलेल्या या कलियुगात भक्तांना शांती समाधानाचा लाभ देणारी ही मोठी पर्वणी आहे.

या काळात संपूर्ण औंध-बाणेर परिसराला तीर्थक्षेत्राचे स्वरूप येते. दर वर्षी येणारी "श्री स्वामींची पालखी" परिसरातील भाविकांच्या जीवनामध्ये आत्मानंदाचा प्रसाद देणारी, स्वामीकृपेची अध्यात्मिक शिदोरी आहे.

पालखी सोहळ्यात सहभागी होण्याने अवघे ईश्वराचे स्वरूप जाणवते. स्वामिशक्तीचे अनेक पैलू अनुभवाला  येतात. अनेक अध्यात्मिक लाभ मिळतात. हा उत्सव पुष्कळ आनंदाचे स्फुरण देणारा आहे. जन्मोजन्मीच्या अशुद्धतेचे निरसन करणारा आहे. अनेक जन्माचे साठलेले पाप बाहेर घालवून देण्याची ही सोपी व्यवस्था आहे. येथे संसाराचा भाव लोप पावून स्वामी शक्तीच्या प्रभावाने पूर्वीच्या उपासना सहज फळाला येतात असा भक्तांचा अनुभव आहे. कुणाला आत्मज्ञानाशी एकरूपता झाल्याचा अनुभव येतो, कुणाला तत्वज्ञानाचे नवीनच स्पष्टीकरण मिळते, तर कुणाला महाप्रसादातून परिपूर्ण तृप्ततेचा आनंद मिळतो. कार्यक्रमात विविधता असली तरी परिणाम एकाच, तो म्हणजे परमानंदाचा लाभ! ही या उत्सवाची शोभा आहे, समाजासाठी भक्ती-उपासनेचा कळस आहे.

प्रवचन परिसंवाद, कीर्तन, संगीत, नृत्य व पुरस्कार सोहळा 2024 कार्यक्रम पत्रिका पाहण्यासाठी येथे क्लिक करा >>

Dindiश्री स्वामींची दिंडी 

श्री स्वामींची दिंडी पालखीच्या निमित्ताने निघते. दिंडी मध्ये परिसरातील शाळांच्या मुलांचा प्रमुख सहभाग असतो. दिंडीतील सहभागाने स्वामी भक्तीचे अध्यात्मातले बळ त्याच्या पाठीशी येते. दिंडीच्या माध्यमातून विध्यार्थी दशेतच अध्यत्माचा पाया मुलांपर्यंत पोहोचतो. यात आनंद आणि एकरूपता देणारे फुगड्या, टिपऱ्या, लेझीम, टाळ मृदूंग असे सामुदायिक सहभागाचे खेळ खेळले जातात. त्यातून गावाचे वातावरण बदलते. परिसरात मंगल सात्विक वातावरण निर्मिती होते. 

वेद पठण

वेदांची लोकांना माहिती व्हावी म्हणून महिला पौरोहित्य वर्गाकडून गेली 24 वर्षे वेगवेगळ्या सूक्तांच्या माध्यमातून समाजाला वेद समजून सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे. वेंदांमधली 23 सूक्ते झाली. या वर्षी वादपठणासाठी ललित पठण हा विषय आहे.

Kirtanकीर्तन 

ज्ञानाद्वारे दृश्यकथा, काव्य, संगीत यांची साथ घेऊन श्रोत्यांना आत्मस्वरूप दाखवीत शुद्ध सामाजिक जागृती करणारा कार्यक्रम म्हणजे कीर्तन. गेल्या 24 वर्षात अनेक थोर कीर्तनकार प्रतिष्ठानच्या या उपक्रमात सहभागी झाले. या माध्यमातून कीर्तन-जुगलबंदी सारखे नावीन्यपूर्ण प्रयोग झाले. श्री धुंडामहारांचे शिष्य कीर्तनकार प्रमोद महाराज जगताप, हर्षद जांभुळकर, भावार्थ देखणे, भीमराव हांडे महाराज, एकनाथ महाराजांचे 13 वे वंशज योगीराज गोसावी महाराज, यांच्या सारख्या अनेक थोर कीर्तनकारांनी आपली कीर्तन कला प्रतिष्ठानच्या व्यासपीठावर सादर केली.

charchasatraपरिसंवाद- समृद्ध सामाजिक प्रबोधनाचा मार्ग 

ज्यांच्या शब्दातून ज्ञान आनंदासह प्रगट होते, ज्यांचे बोलणे समाजाला सुखशांतीसाठी मार्गदर्शक ठरते अशा ज्ञानी, यशवान, अधिकारी व्यक्तींसोबत केलेला सामुदायिक संवाद म्हणजे परिसंवाद. परिसंवाद हा समाजात आत्मविश्वास वाढवून यशाकडे नेणारा समृद्ध सामाजिक प्रबोधनाचा मार्ग आहे. 
प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी एका विषयावर कार्यक्रमाची रूपरेषा आखून त्याच विषयावर चिंतन मनन करून समाज परिवर्तनाचे प्रयत्न केले जातात. परिसंवादाच्या माध्यमातून 7 दिवस त्या वर्षांसाठी ठरलेल्या विषयाची गुंफण होते. या वर्षी "सहकार्य - एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ" हा विषय आहे.

श्री स्वामींच्या पालखी सोहळ्यातील विविध कार्यक्रमाची क्षणचित्रे