सालाबाद प्रमाणे यावर्षी अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांच्या पालखीच्या पादुकांचे औंध, पुणे येथे आगमन गुरुवार, दिनांक ०९ फेब्रुवारी २०२३ या दिवशी झाले. या निमित्ताने दरवर्षी प्रमाणे सात दिवस सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचा शुभारंभ दिंडीने, शनिवार ०४-०२-२०२३ रोजी दुपारी उमाशंकर सोसायटी औंध येथून झाला. या सोहळ्यात दिनांक ०४ ते ०९-०२-२०२३ या कालावधीत सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले होते. सर्व स्वामी समर्थ भक्त मोठ्या प्रमाणावर प्रवचन परिसंवाद, कीर्तन, संगीत, नृत्य व पुरस्कार या कार्यक्रमात सहभागी झाले आणि आरती प्रसादाचा लाभ घेतला.
मानव धर्माचे अधिष्ठान परमार्थ व अध्यात्म आहे. एकविसाव्या शतकात अध्यात्माचा नवीन अर्थ शोधून मानव मानवतेकडे कसे उन्नत होईल हा दृष्टीकोन ठेऊन श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान कार्य करीत आहे. विज्ञान, धर्म, कर्मकांड, अध्यात्म आणि मानवतेचा विकास ह्या सर्वांचा एकविसाव्या शतकात कसा समतोल राखता येईल; मानवतेची पातळी वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक आणि राष्ट्रीय स्तरांवर कशी वाढवता येईल त्या साठिचा हा खारीचा वाटा आहे.