ॲडव्होकेट श्रीकांत गोविंद पाटील यांचे स्वामी आराधनेवर मार्गदर्शन

दर गुरुवारची स्वामींची आरती
दर गुरुवारची स्वामींची आरती

श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने दर गुरुवारी स्वामींची आरती हा कार्यक्रम केला जातो. या कार्यक्रम निमित्ताने स्वामी भक्तांकडून स्वामींची भावपूर्वक आराधना होते. स्वामी चरणांशी समर्पण होते. एकूण ३२ मिनिटाच्या या कार्यक्रमात चिंतन, आरती, कापूरआरती, मंत्रपुष्पांजली, नामस्मरण, ध्यान, व स्वामी विचार याचा समावेश आहे. 

'स्वामी आराधना' हा स्वामी परिवारातील एक महत्वपूर्ण उपक्रम आहे. अध्यात्मिक विचाराच्या आधारावर सुख-समाधान, आनंद होण्यासाठी जी कृती सर्व धर्मग्रंथाना (प्रस्तानत्रयीला) अपेक्षित आहे, स्वामी आराधनेच्या निमित्ताने त्याच पद्धतीची कृती करून, खऱ्या अर्थाने स्वामींना जीवन अर्पण करून त्याच्या करुणेने कृतार्थ होणे हा उद्देश येथे आहे. 

स्वामी आराधनेमध्ये तन, मन, धन व सर्वस्व स्वामींना क्रमाने अर्पण होणे गरजेचे आहे. आराधनेत शरीराकडून अनुष्ठान होणे, मनाकडून एकाग्रता होणे, स्वामी भावात चित्ताची तल्लीनता होणे, आणि आपल्या हातून धन-दानधर्म घडून अध्यात्मिक समृद्धीची वाढ होणे अपेक्षित आहे. आराधनेमुळे आपल्यात परिवर्तन घडण्यास सुरुवात होऊन मानसिक शक्ती वाढवणाऱ्या स्वामीं कृपेची ओळख होते.

नियमित आराधनेचा अंतिम परिणाम आहे जीवन सुगंधी व निरामय आरोग्य होणे. आजच्या धकाधकीच्या आणि ताण-तणावाच्या जीवनात हे केवळ स्वामींना शरण गेले तर त्याच्या कृपेनेच होऊ शकते. 

स्वामी आराधना कार्यक्रमाच्या सुरुवातीला, प्रथम स्वामीसमर्थाचा गाजर करून ब्रह्माण्डनायक स्वामी समर्थाना आपल्या कार्यक्रमास फोटोच्या माध्यमातून (प्रतिकातून) आसनस्थ करतो. स्वामी आसनावर आलेले आहेत ही भावना मनात स्थिर झाली की त्यांना पूर्णपणे शरण जाऊन आपले मनातले भाव त्यांच्या पुढे अर्पण करतो. 

ओंकाराचा उच्चार तीन वेळा करून अधिभौतिक आधिदैविक आणि अध्यात्मिक असा उद्घोष केला जातो. या पद्धतीने जीवनाला आवश्यक अशी शुद्ध अध्यात्मिक शक्ती प्राणापासून मिळते. ओंकार हे प्राणाचे (प्रणवाचे) प्रतीक आहे. विश्वाला आवश्यक अशी शक्ती सूर्यापासून प्राप्त होते. सूर्य हा विश्वाचा प्राण आहे. अशा दृष्टीने पाहता अमृत तत्वांच्या प्राप्तीची इच्छा कारणाऱ्यानी प्राण व सूर्य ह्यांची उपासना ओंकार स्वरूपात केली पाहिजे. हे सर्व स्वामी आराधने मध्ये सहज घडून येते.  

आरतीमधील समर्पणाची भावना व त्याचे महत्व

भावनापूर्वक अर्पण केलेली प्रत्येक वस्तू भगवान स्वीकारतो. म्हणजे काय तर अर्पण केलेल्या वस्तूच्या माध्यमातून भक्तांचे भाव स्वीकारतो. अशा सात्विक भावाने अर्पण केलेल्या वस्तूला प्रसाद म्हणले जाते. उदाहरणार्थ भगवंतांच्या चरणावर समर्पित झालेले फळ प्रसाद बनते आणि तो प्रसाद आपल्या जीवनात प्रसन्नता निर्माण करतो. म्हणूनच आरतीत वस्तूचे नाही तर भावाचे महत्व खूप आहे. समर्पणाचे महत्व खूप आहे. 

जीवन रसमय आहे तो पर्यंत ते समर्पित करायचे असते. यासाठी उसाचे उदाहरण बघूया. उसाचा रस काढताना ऊस मशीन मधून एकदा, दोनदा, तीनदा अगदी पूर्ण रस निघे पर्यंत अनेकदा काढला आणि त्याचे चिपाड म्हणजेच चोथा झाल्यावर आपल्याला म्हटले की "आता हा ऊस चोखा" तर तो आपण घेऊ का? तसे आयुष्यातले सगळे रस संपल्यावर, जीवनाचे चिपाड झाल्यावर, ते निरस झाल्यावर भगवंतांना म्हणावे "भगवंता हे जीवन आता तुझ्याचसाठी आहे". तर भगवान स्विकारतील का ? म्हणून जीवन रसमय आहे तो पर्यंत ते समर्पित केले पाहिजे.  

सारांश, आपले जीवनपुष्प स्वामींच्या चरणावर मनापासून अर्पण करावे. सोबत कर्मफळ म्हणजे आपण केलेल्या कामाची फळे त्याला अर्पण करावी. असे करणे हे खरे समर्पण आहे. हे समर्पणाचे महत्व जाणून घ्यावे आणि मग; निरस नाही तर विविध रसांनी भरलेला 'सरस' जीवनकाल चालू असतानाच स्वामींच्या कामाला लागावे हेच त्यांचे खरे पूजन आहे. नियमित स्वामी आराधनेने हे भान येऊ लागते. 

स्वामींना केलेल्या प्रार्थनेचा असा अर्थ आहे की भक्तांचे त्यांना समर्पण होणे, भक्तांची शरणागती होणे. त्यांच्याकडे त्याच्या कृपेची, सहाय्याची मागणी होणे. सोबत आपल्या सीमांची किंवा मर्यादांची स्वतःला जाणीव होणे, आपल्यातल्या अपुर्णत्वाची जाणीव आणि अहंकाराचे विसर्जन होणे. 

हे येव्हढे सगळे होण्यासाठी स्वामी आराधनेची जरुरी आहे. हे काही स्वबळावर करण्याचे एकट्याचे काम नाही. पण केवळ प्रार्थनाच यासाठी पुरेशी नाही तर प्रार्थनेसोबत नेटाने प्रयास, प्रयत्न करणे पण तितकेच महत्वाचे आहे. असे भक्तांचे प्रयत्न आणि आणि प्रार्थनेतील शक्ती जेव्हा एकत्रित होऊन काम करू लागतात तेव्हा असाध्य, अशक्य वाटणारे कामही पूर्णत्वाला जाते. मग "अशक्य ही शक्य करतील स्वामी" या महामंत्राची अनुभूती आपल्याला होऊ लागते. 

असा सुंदर लाभ सहजपणे देणाऱ्या स्वामी आराधना कार्यक्रमात प्रत्येकाने आवर्जून सहभागी व्हावे. 

ॲडव्होकेट श्रीकांत गोविंद पाटील
संस्थापक अध्यक्ष 

>>  अग्निहोत्राची थोडक्यात ओळख जाणून घेण्यासाठी क्लिक करा.