भजन, स्वरगंधा, शैलजा दामले- कार्यक्रम वृत्तांत

भजन, स्वरगंधा- शैलजा दामले, श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान पालखी सोहळा १ मार्च २०१८

श्री
स्वामी समर्थ प्रतिष्ठानतर्फे २०१८ च्या पालखी सोहळ्यात दिनांक मार्च २०१८ रोजी शैलजा दामले, स्वरगंधा यांनी अकरा बहारदार भजने सादर केली. सर्व भाविकांना ब्रह्मानंदीच्या भावात भुलवून टाकणारा, हरी भजनाचे सुख लुटण्याचा आनंद देणारा हा अनुभव होता.

कार्यक्रमाची सुरुवात पट्ठे बापूरावांच्या "आधी गणाला राणी आणिला, नाहीतर रंग पुन्हा सुना सुना हो" या भावमधुर गणाने झाली. यात, आपल्या मोहक चालीतुन व गोड शब्द रचनेतून मनाचा मी-तू पणा सांडुन टाकणारे सद्गुणांचे योगिक वर्णन आहे.

नंतर श्री ज्ञानेश्वरांचे स्मरण करून आनंदाच्या विश्वात विहार कारविणारे "जय जय रामकृष्ण हरि" हे भजन गायले. दुःख हारक, दुःख विमोचक आणि दुर्जनांची संगत हरवून टाकणारे श्री कृष्ण भगवानांच्या कृपेचे वर्णन यात आहे. अंतरंगात सुंदर भक्ती-भावांचा ठेका धरायला लावणारे असे हे भजन झाले.

तिसरे भजन झाले विनायकाचे. "विनायका हो सिद्ध गणेशा रंग सभेला या तुम्ही या ।।" असे गजाननाला आपल्या सोहळ्याला येण्याचे आवाहन यातून घडले. सोहळ्यात आलेल्या भाविकांना विनायकाचा आशीर्वाद प्राप्त करून देणारे हे भजन आहे. यातला विनायक हा अपराधांना पोटात घालणारा, भक्ती-प्रेमाचे समाधान देणारा "सिद्ध गणेश" आहे

पुढचे भजन देवीची स्तुती करून वरदान मागणारे भजन होते "मयूरासना मधुरानना मुदितमना करु प्रार्थना ।।". हे माधुर्याने भरलेले भजन श्री शारदादेवींना सुख-शांतीची प्रार्थना करणारे आहे.. 

या नंतरचे "स्वामींची पालखी" हे फारच बहारीचे भजन झालेश्री स्वामी समर्थ हे श्रमलेल्या जीवाला प्रेमाची साउली देणारे, भक्तांची माउली, योगीराज माउली आहेत असे वर्णन यात आहेया आर्त भजनाने हृदयात स्वामीनामाचा गजर सुरु होऊन, अंतरंग टाळ-मृदूंगाच्या स्वरांनी भरून गेले.

शैलजा दामले दिप प्रज्वलन करताना, श्री संतोष देशमुख, ऍड. श्रीकांत पाटील, डॉ. आर टी वझरकर, ह. भ. प. हंडे महाराज आणि मान्यवर
शैलजा दामले दिप प्रज्वलन करताना, श्री संतोष देशमुख, ऍड. श्रीकांत पाटील, डॉ. आर टी वझरकर, ह. भ. प. हंडे महाराज आणि मान्यवर

दिनांक मार्च हा संत मीराबाईंचा स्मृती दिन. या निमित्ताने त्यांच्या गोडसुखकारी अभंगाचे स्वर शैलजा दामलेंच्या मुखातून आले " गढसे तो मीराबाई उतरी करवालीनो साथ रामकृष्णहरि जयजय रामकृष्णहरि ।।"

भक्तीची रंगत अधिकच परिपूर्णतेकडे नेणारे पुढचे भजन होते, "टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संग. देवाजीच्या द्वारी आज रंगला अभंग". स्वामी समर्थांच्या अंगणात सर्व भाक्त एक आहेत, तेथे गरीब-श्रीमंत असा भेदभाव काही नाही याची जाणीव देऊन पुढे या अभंगाद्वारे भक्तांना उपदेश केला आहे, "जन सेवे पायी काया झीजवावी, घाव सोसूनीया माने रिझवावी".

यापुढचे अंतरंगात गुरुकृपेचा गाजर करणारे भजन होते, "दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा"

या नंतर शंकराची प्रसन्नता प्राप्त करून देणारे भजन झाले "शंभो शंकरा शिवशंभो शंकरा शंभो शंकर सांब सदाशिव शंभो शंकरा ।।". हे शंकरा चंद्रकले प्रमाणे अंतरंगात भक्तीचा विकास घडवून आम्हा भक्तांचे रक्षण कर, अशी आर्त प्रार्थना यात आहे.

दहावे सादरीकरण होते एकनाथ महाराजांच्या "नेसले  बाई चंद्रकळा ठिपक्यांची तिरपी नजर माझ्यावारी या सावळ्या कृष्णाची ।।" या गोड, गूढअर्थपूर्ण गवळणीचे. मनाला ठेका लावणारे, मधुर अशा गोपी भावाचे दर्शन यात झालेमनाची शंका फिटून अंतरंगात हरी चरणाशी मिठी मारायला लावणारे हे भजन झाले.

कार्यक्रमाचा शेवट हरी गजराने झाला. "हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाळ म्हणा हरी नारायणा गोविंद गोपाळ हरी नारायणा ।।या गजराने सर्वाना एका उंचीवर नेऊन पोहोचवले, आणि या भावपूर्ण कार्यक्रमाची सांगता झाली